नाशिक | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यभरात जवळपास ११ हजार शिक्षकांची भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. २५ जानेवारीला पर्याय निवडलेल्या शिक्षकांची गुणवत्ता जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेबाबत कोणाची काही शंका किंवा तक्रार असल्यास त्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती प्रसार माध्यमांद्वारे जाहीर केली आहे. यासाठी ईमेलद्वारे संपर्क साधावा लागणार आहे. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत ११ हजार ८५ उमेदवारांची शिक्षक म्हणून शिफारस करण्यात आली असून, जवळपास २० वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती होणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. उमेदवारांचे प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विनामुलाखतीची शिफारस प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलवर अंतिम केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय; तसेच विविध न्यायनिवाडे, सरकारी आदेश अशा सर्व बाबी उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पाहता येणार आहे.
शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समितीकडून केली जाणार आहे. उमेदवार हा पात्रतेसंबंधीच्या कागदपत्र पडताळणीत निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढल्यास त्याची निवड रद्द होणार आहे. उमेदवारांच्या निवडीबाबत काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी edupavitra2022@gmail.com या ईमेलवर अर्ज सादर करता येणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले
