नवी दिल्ली | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात १० , हिमाचल प्रदेशात ०१ आणि कर्नाटक मध्ये ०४ जागांवर मतदान झाले. उत्तर प्रदेशमध्ये सपाला मोठा फटका बसला आहे. येथे सपाच्या ७ आमदारांनी भाजपला मतदान केले.
दरम्यान १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण ५६ जागा रिक्त आहेत. यापैकी १२ राज्यांतील ४१ राज्यसभेच्या जागांवर उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. उर्वरित जागांसाठी मतदान झाले आहे. यापैकी भाजपने ८ जागा जिंकल्या आणि यूपीमध्ये सपाला दोन जागा मिळाल्या. तर कर्नाटकातील तीनही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या,आणि हिमाचलमध्ये काँग्रेसला बहुमत असूनही एक जागा गमावली आणि भाजप तेथे जिंकला.
या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात आपला आठवा उमेदवार उभा केला आणि सपा आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे तो विजयी झाला. भाजपचे ७ आणि समाजवादी पक्षाचे ३, या दहा जणांचा विजयही जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र क्रॉस व्होटिंगमुळे भाजपने ८ तर सपाने २ जागा जिंकल्या आहेत. सपा उमेदवार जया बच्चन यांना सर्वाधिक ४१ मते मिळाली आहेत.

