जळगाव, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– कृषि विभागाच्या विविध समित्यांच्या आढावा बैठक दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी होणार असुन तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना प्रोत्साहन म्हणून गौरविण्यात येईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आजच्या बैठकीत निर्णय घेतला.
सविस्तर वृत्त असे की आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकरी व शासकीय सदस्यांना आमंत्रित करुन विविध शासकीय समित्यांची मासिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका कृषी अधिकाऱ्यांचा होणार गुणगौरव –
जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवरून जळगांव जिल्हयातील सर्व तालुका कृषि अधिकारी यांची सन २०२३-२४ गोपनीय अहवालाची माहिती भरते वेळी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनेची प्रगतीच्या आधारावर १ ते १० गुणांकन देण्यात यावे. या योजनेतील तालुक्याच्या प्रगतीच्या आधारावर उत्कृष्ट तालुका कृषि अधिकारी यांची क्रमवारी ठरवुन उत्कृष्ट अधिकारी यांचे जाहीर करुन त्यांचा गौरव करण्यात यावा व याबाबत माध्यमातून प्रसिद्धी द्यावी जेणे करून इतरांनाही कामाची प्रेरणा मिळेल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्ह्यातील हरितगृह, शेडनेट तपासणी अहवाल सादर-
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत वैयक्तिक बाबीमधील संरक्षित शेती घटकांतर्गत मोका तपासणी होऊन अनुदान अदायगी झालेल्या हरितगृह व शेडनेट गृह यांची १०० टक्के फेर तपासणीचा यावेळी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार जळगांव जिल्हयात एकूण ३२८ शेतक-यांना हरितगृह व शेडनेट यांचा लाभ देण्यात आलेला आहे. फेरतपासणी करते वेळी २९१ हरितगृह व शेडनेट सुस्थितीत जागेवर आढळुन आलेले होते.
