जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा
केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जळगावच्या जैन हिल्सवर एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला. भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (NRCB), त्रिची आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पुवन’ या केळीच्या दोन नवीन जातींच्या टिश्यूकल्चर रोपांच्या निर्मितीबाबत हा करार करण्यात आला आहे.

मान्यवरांची उपस्थिती आणि करार
या ऐतिहासिक प्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन तसेच राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन उपस्थित होते. करारावर डॉ. आर. सेल्व्हराजन (NRCB) आणि जैन इरिगेशनतर्फे टिश्यूकल्चर विभागाचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील व डॉ. के. बी. पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील चर्चासत्रात या कराराच्या प्रतींचे आदान-प्रदान करण्यात आले.
यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिता वाघ, केंद्रीय कृषी सहसचिव प्रियरंजन दास, फलोत्पादन संचालक अंकुश माने, आयसीएआरचे एडीजी डॉ. व्ही. बी. पटेल आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवीन जातींची वैशिष्ट्ये
जैन इरिगेशन आता या दोन प्रगत जातींची रोपे तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे:
१. कावेरी वामन (Kaveri Vaman):
• निर्मिती: भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), मुंबई.
• वैशिष्ट्य: झाडाची उंची अवघी १५०-१६० सें.मी. असल्याने वादळ-वाऱ्याचा फटका बसत नाही.
• फायदा: झाडांना आधार द्यावा लागत नसल्याने खर्च १० टक्क्यांनी कमी होतो.
• उत्पादन: घडाचे वजन १८ ते २५ किलो असून हेक्टरी ५५ ते ६० टन उत्पादन मिळते.
२. कावेरी पूवन (Kaveri Poovan):
• निर्मिती: राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची (१५ वर्षांचे संशोधन).
• वैशिष्ट्य: ही जात मर रोग (Fusarium Wilt TR-1, TR-4) आणि विषाणूजन्य रोगांना पूर्णपणे प्रतिकारक आहे.
• फायदा: खारट आणि क्षारयुक्त जमिनीतही हे वाण उत्तम येते आणि स्थानिक वाणापेक्षा २० टक्के अधिक उत्पादन देते.
शेती आणि तंत्रज्ञानाच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्याशी जोडून राहा.


