नवी दिल्ली | १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपकडून २०२४ लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यादीत बहुचर्चित भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे.
जळगावमधून स्मिता वाघ, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधून, तसेच नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे, तर रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हिना गावित या सध्या तिथल्या खासदार आहेत. त्या गेल्या १० वर्षांपासून नंदुरबारच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी पक्षाने दिली आहे.
सुभाष भामरे यांच्या उमेदवारीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु होती. त्यांचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा सुरु होती. परंतु पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना धुळे मतदार संघातून पुन्हा संधी दिली आहे.
जळगाव मतदारसंघात मात्र भाजपने धक्कातंत्रचा अवलंब केला आहे. जळगावात भाजपने विद्यामान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं आहे. या ऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या. तसेच ते भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत. स्मिता वाघ यांच्याकडे जळगावात समर्थक वर्ग मोठा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्लाच मानला जातो. असं असलं तरी आगामी काळात काय निकाल येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातुन संधी देण्यात आली आहे. रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. रक्षा खडसे यांची उमेदवारी रद्द केली जाईल, अशी चर्चा होती. पण त्यांना पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे.
अकोला मतदारसंघातून अनूप धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे. अनूप धोत्रे हे अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव आहेत.
रामदास तडस यांना वर्धा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. रामदास तडस हे २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते.
दुसऱ्या यादीतील महाराष्ट्रातील उमेदवार :
नागपूर – नितीन गडकरी, चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर, जालना – रावसाहेब दानवे, दिंडोरी – भारती पवार, भिंवडी – कपिल पाटील, उत्तर मुंबई – पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा, पुणे – मुरलीधर मोहोळ, अहमदनगर – सुजय विखे पाटील, बीड – पंकजा मुंडे, लातूर – सुधाकर श्रृंगारे, माढा –रणजितसिंह निंबाळकर, सांगली – संजय काका पाटील
