ठाणे दि.२४,( वास्तव पोस्ट न्यूज )– कोकण विभागातील गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत (म्हाडा) ५ हजार ३११ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडतीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आला.
आपले हक्काचे स्वमालकीचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, त्यातील काही भाग्यवंतांचे स्वप्न आज या सोडतीद्वारे पूर्ण झाले आहे याचा आनंद आणि समाधान वाटत असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. सर्वसामान्य लोकांना म्हाडाची घरे वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. ही घरे बांधताना कामांची गुणवत्ता राखली गेली पाहिजे, म्हाडाची पॉलिसी देखील सुलभ आणि सुटसुटीत असायला हवी. यावर्षीच्या सोडतीमध्ये ज्यांना घरे मिळाली त्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले, तसेच आगामी वर्षात याहून जास्त घरे नागरिकांना उपलब्ध व्हावीत यासाठी म्हाडाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित होते.
