मुंबई ( वास्तव पोस्ट ) : संविधान दिनाचे औचित्य साधत संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात अनावरण करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना असून हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या संबंधित सर्व पदाधिकारी, वरिष्ठाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
भारताला मिळालेले संविधान हे त्यांच्या उत्तुंग अशा कर्तृत्वाचा अविष्कार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनीच अनावरण हे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला मिळालेल्या संविधानप्रती व्यक्त झालेला परमोच्च आदराचा क्षण असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेने आणि प्रतिभेने जगाला समता-बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या वतीने शर्मा यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला युनेस्कोचे महासंचालक, ५० हून अधिक देशांचे राजदूत तसेच युनेस्को सचिवालयाचे सदस्य उपस्थित होते.
युनेस्कोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेटस्वरूपात अर्पण केल्याबद्दल युनेस्को, पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेत आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने युनेस्कोमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक बाब असून, या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले.


