जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरातील राजकमल टॉकीजजवळ जिल्हा परिषद बचत भवन इमारतीत ‘बहिणाबाई मार्ट’ या विशेष प्रकल्पाचे आज जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकोपयोगी प्रकल्प आज जनतेच्या सेवेत दाखल झाला.
या प्रकल्पाअंतर्गत जळगावातील नागरिकांना आता वर्षभर महिला बचत गटांनी बनवलेली उत्पादने खरेदी करता येणार असून, त्याचबरोबर पारंपरिक चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचीही संधी मिळणार आहे. “महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे हे नवे पर्व आहे. बहिणाबाई मार्ट आणि खाऊ गल्लीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल,” असे उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढले. लवकरच या मार्टमध्ये ‘खाऊ गल्ली’ कार्यान्वित होणार असल्याची माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, तसेच माजी महापौर विष्णू भंगाळे उपस्थित होते.
