Home » क्राईम » एकनाथ खडसे यांना दाऊद व छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी !

एकनाथ खडसे यांना दाऊद व छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी !

जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद नोंद केली आहे.

आपल्याला चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून १५ आणि १६ एप्रिल रोजी मोबाईल फोनवरून ही धमकी दिल्याचे खडसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे फोनवरून धमकी देणाऱ्याने खडसेंना सांगितले. पहिल्यांदा असा फोन आल्यानंतर खडसेंनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा फोन आला. “तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोकं मारणार आहेत,’ अशी धमकी त्यांना देण्यात आली. असे फोन चार ते पाच वेळा खडसेंना आल्यानंतर मात्र त्यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठले.

सदर मोबाईल क्रमांक तपासले असता हे फोन लखनऊ आणि अमेरिकेतून आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांना यापूर्वीही कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून धमकी देण्यात आली होती.

एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. खडसेंनी देखील या गोष्टीस दुजोरा दिला आहे. दरम्यान दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!