Headlines
Home » सामाजिक » बाबासाहेब फक्त दलितांचे नव्हे, तर सर्व समाज घटकांचे कैवारी; प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांचे प्रतिपादन

बाबासाहेब फक्त दलितांचे नव्हे, तर सर्व समाज घटकांचे कैवारी; प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांचे प्रतिपादन

जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील विवेकानंद नगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रा. डॉ.सत्यजित साळवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. थोरांची ओळख इयत्ता तिसरीच्या पुस्तकात ‘दलितांचे कैवारी’ हा धडा आमच्या पिढीला शिकवला गेला. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे कैवारी होते, असा संबोध मनात पक्का झाला. त्यामुळे इतर समाज घटकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक कार्य दुर्लक्षित राहिले.

बाबासाहेबांनी चळवळीची सुरुवात करताना पहिला मोर्चा शेतकऱ्यांसाठी काढला.खोतांच्या जुलमी राजवटीला, अत्याचाराला आणि सावकारी जाचाला आणि पाशाला उलथवून टाकण्यासाठीचा तो मोर्चा होता. संविधानात कलम ३४० हे ओबीसींसाठी महत्त्वाचे कलम अस्पृश्य व आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या कलमा अगोदर घेतले. ओबीसींसाठी राजीनामा देणारे बाबासाहेब पहिले मंत्री होते. महिलांच्या न्याय हक्कासाठी हिंदू कोड बिल द्वारे त्यांनी पित्याच्या संपत्तीत स्त्रियांना वारसा हक्क बहाल केला. विधवा पुनर्विवाहाचा विचार मांडला.मुल-बाळ होत नसलेल्या महिलांसाठी मुलं दत्तक घेण्याचा विचार मांडला.

कामगारांसाठी स्वतंत्र कायदे करून श्रमिक जीवनाला आधार मिळवून दिला. विद्यार्थी दशेमध्ये आपण कसे वागले पाहिजे? कोणते ध्येय ठेवले पाहिजे? याच्या संदर्भात देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वर्गाला प्रेरणा देतात, असे सर्व समाज घटकांसाठी सचेत कार्य असून सुद्धा बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे कैवारी असा संबोध आमच्या मनात चिकटून बसला आहे. तो संबोध मनातून काढला पाहिजे तरच बाबासाहेब समजून घेता येतील. खरंतर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते. आपल्या देशातील जातीव्यवस्था एवढी भयंकर आहे की, अस्पृश्य जातीत जन्मलेल्या प्रकांड पंडिताच्या अचंबित करणाऱ्या कार्याकडे आम्ही मुद्दाम डोळेझाक करतो. भटशाही आम्हाला डोळस होऊच देत नाही, असे परखड आणि स्पष्ट मत आपल्या व्याख्यानातून देत डॉ.सत्यजित साळवे यांनी उपस्थितांना जागे करण्याचे काम केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमांचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला पौर्णिमा फाउंडेशनच्या अध्यक्षा शालिनी बिऱ्हाडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ. प्रमोद तायडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किरण बनकर यांनी मानले. कार्यक्रमाला गिरीश पाटील, सुनील राजपूत, इंजिनियर बोदडे, रत्ना महाजन, विजय तायडे, जोत्स्ना तायडे, वैशाली कोल्हे, शरद सुपे, नितीन शिंदे, दीपक सोनार, राजू बिऱ्हाडे, नितेश वाघ, हितेंद्र कोल्हे, नागेश मराठे, विलास सुतार तसेच विवेकानंद नगरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!