Home » महाराष्ट्र » सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा; बिश्नोई गँगला संपवून टाकू

सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा; बिश्नोई गँगला संपवून टाकू

मुंबई | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट निवासस्थानाबाहेर गोळीबार केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधून दोन जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली.

सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात आणि देशातील चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, मुंबई पोलिसांनी चोख कामगिरी करत गोळीबार करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अभिनेता सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. भेटीवेळी सलमान खानचे वडील, ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान उपस्थित होते. यावेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी आणि युवासेनेचे राहुल कनाल हे देखील उपस्थित होते.

दरम्यान या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी बिहार येथील रहिवासी असून पोलिसांनी २५ तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत घेतले आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असून चौकशीच्या माध्यमातून सर्व सत्य बाहेर येईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सलमान खान आणि त्यांच्या नातेवाईकांना पोलीस सुरक्षा वाढवण्यात येणार असुन तशा सूचना पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी आहे. यापुढे अशा प्रकारचे धाडस पुन्हा कोणी करू नये याची काळजी सरकार घेईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र आणि मुंबईत कोणतेही गॅंगवॉर नाही, येथील अंडरवर्ल्ड संपुष्टात आलं आहे. हा महाराष्ट्र आहे इथे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. बिश्नोईला संपून टाकू. यामध्ये ज्या कोणत्या गॅंगचा हात असेल तर त्याला पूर्णपणे उखडून फेकू असा इशारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!