मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जागतिक कृषी पुरस्कार-२०२४’ ने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज मिळालेल्या या जागतिक कृषी पुरस्कारामुळे राज्याच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली असुन हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, शेतात घाम गाळून कष्ट करणाऱ्या प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्याचा पुरस्कार असुन हा पुरस्कार बळीराजाला समर्पित करत असल्याचे याप्रसंगी जाहीर केले.
पूर, अतिवृष्टी, दुष्काळ या सारथ्य नैसर्गिक संकटाना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. शेतकरी हा नवीन बदलांनाही स्वीकारत आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. सिंचनाच्या १२५ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून महाराष्ट्र हे शेतीत क्रमांक एकचे राज्य ठरावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने एनसीपीए सभागृहात आयोजित या समारंभास महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, ‘वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम’ चे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंगे, फोरमचे आशिया प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. विलियम्स दार, आफ्रिका प्रांताचे उपाध्यक्ष प्रो. लिंदवे सिंबादा, अमेरिका प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. केनिथ क्वीन्, फोरमचे भारतातील संचालक तथा इंडियन चेंबर ऑफ फूड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष डॉ.एम.जे. खान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.
