जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज) – बोदवड परिसर सिंचन योजना ता. बोदवड जि. जळगाव या योजनेतील टप्पा -१ मधील ३२५४० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी दाबयुक्त बंदिस्त नलिका वितरण (PDN) प्रणालीच्या कामासाठी मा. गिरीष महाजन, मंत्री, ग्राम विकास आणि पंचायती राज, व पर्यटन महाराष्ट्र राज्य यांच्या अथक पाठपुराव्यामुळे कामे सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. योजनेस रु. ३७६३.६१ कोटी किमतीस तिसरी सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

सद्यस्थितीत टप्पा -१ ची पुर्णा नदी जुनोने धरण जोडणारी उपसा प्रणाली व जुनोने धरणाची कामे ८५% पुर्ण झाली आहेत, जुन २०२५ मध्ये जुनोने धरणामध्ये पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे. योजनेच्या टप्पा-१ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील, मुक्ताईनगर तालुक्यातील-६, जामनेर- ११ व बोदवड तालुक्यातील ३३ आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील -१८ व मोताळा तालुक्यातील -१५ अशा एकूण ८३ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यामुळे ३२५४० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. योजनेंतर्गत जुनोने धरणावरुन दोन वेगवेगळ्या पंपगृहाद्वारे पाणी उपसा करुन एका उपसा प्रणालीने एकूण ४२ गावांच्या १५८३० हेक्टर आणि दुस-या उपसा प्रणालीने एकूण ४१ गावांच्या १६७१० हेक्टर क्षेत्र दाबयुक्त बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनासाठी शास्वत पाणी उपलब्ध करुन मिळणार आहे. सदरची कामे करण्यासाठी रु.१२२०/- कोटी रकमेची आवश्यकता आहे. याची कामे ऑक्टोबर २०२४ पासुन प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे.
