म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त म्हसावद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आणि भीमसैनिक कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य भीम गीत व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांच्या सादरीकरणाने वातावरण भारून टाकले, तर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सुरेल आणि ज्वलंत सादरीकरण करताना कडूबाई खरात आणि त्यांच्या टीमने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांसारख्या महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी गीतांचे सादरीकरण केले. प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले.
या प्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कडूबाई खरात यांच्यासारख्या कलाकारांच्या सादरीकरणामुळे मनोरंजनासोबतच वैचारिक जागृती घडते. डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार गीतांमधून प्रभावीपणे होतो. गावपातळीवर असे कार्यक्रम होणे म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या बीजाची पेरणी आहे. गावाचा विकास हा भौतिक प्रगतीसोबतच वैचारिक प्रगतीतही दिसायला हवा आणि आजचा कार्यक्रम त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ग्रामस्थांचा प्रेम व सन्मान मला अधिक जोमाने विकास कामांसाठी प्रेरित करतो. मी म्हसावदच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन सरपंच गोविंदा पवार, सतीश सूर्यवंशी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सत्यजित साळवे, धनराज मोतीराय, संजय पवार यांनी केले तर आभार अमित सोनवणे व महेंद्र शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, यांच्यासह पदाधिकारी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील अनेक सरपंच – उपसरपंच, समाज बांधव आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन प्रेरणादायी आणि अनुशासित पद्धतीने पार पडले. सरपंच व भीमसैनिकांचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरले.
