मुंबई | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात उत्पादित होणारे कृषी उत्पादने आणि शेतमालासाठी आता ऑनलाईन ई-कॉमर्सचा मंच मिळाला असून कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचे अनावरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्यात सामंजस्य करार झाला.
यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे म्हणाले, देशात मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट क्रांती झाली असून त्याचा सर्वाधिक फायदा ई-कॉमर्स क्षेत्राला झाला आहे. भविष्यात भारतातील ई-कॉमर्स २५० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा कृषी क्षेत्राला व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप व वेब प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न होता.
ॲप कोठुन डाउनलोड करावे-
हे ॲप प्ले स्टोअर मध्ये Maha Agro Mart या नावाने उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड ( लिंक – https://play.google.com/store/apps/details?id=com.maidc.mart ) करून फ्लिपकार्ट ॲमेझॉन याप्रमाणेच १३७० उत्पादने खरेदी करता येऊ शकतात. या ॲपवर ऑनलाईन पेमेंट सुद्धा करता येऊ शकते.
पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या अपद्वारे केला आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी, बचत गट, स्वयं सहाय्यता गट, स्टार्टअप, लहान मोठे व्यावसायिक व शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने, प्रक्रिया केलेली उत्पादने व शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार असल्याने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. यावेळी अपर मुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील, पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, पोस्टमास्टर जनरल के. सोमसुंदरम, मुंबई पोस्ट विभागाचे अजिंक्य काळे, श्रद्धा गोकर्ण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
