Headlines
Home » राजकीय » तू आडवा येच… तुला गाडूनच पुढे जातो ; कणकवलीत उद्धव ठाकरेंनी शाब्दिक तोफ डागली

तू आडवा येच… तुला गाडूनच पुढे जातो ; कणकवलीत उद्धव ठाकरेंनी शाब्दिक तोफ डागली

चिपळूण | दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज) – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत राऊत यांना विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. जर असे झाले तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत दोनवेळा विजयी झाले आहेत. इकडे नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने दिलेल्या ताकदीच्या बळावर आता पराभवाची मालिका खंडित करण्याचे नारायण राणे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत ह्यांच्या प्रचारार्थ कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त सभा प्रचंड गर्दीत पार पडली. ह्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी ‘आता महाराष्ट्र हितासाठी मशाली पेटवा’ हा एल्गार केला. यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे, तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक तोफ डागली.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, “आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली. मराठीत एक म्हण आहे. त्या म्हणी मी केल्या नाहीत किंवा तुम्ही केल्या नाहीत. पण एक म्हण अशी आहे की, शुभ बोल रे नाऱ्या. मी येणार म्हटल्यानंतर कसे येतात बघतो म्हणाला. मी येऊन उभा आहे. तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो. अरे तुला लाज वाटली पाहिजे. दोन तीन वेळेस तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला. माझ्या घरात तिकडे उभारला तिकडे साफ करुन टाकला. लाज नाही लज्जा नाही. फक्त बडबडतो”, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर केली.

आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरे म्हणाले, चार दिवसांपूर्वी येऊन गेलो होतो. म्हटलं आता काय बोलायचं, पण आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे नेते पचकून गेले. बेअकली जनता पार्टी आहे. शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली नाहीतर दुसरे काय असणार? आज पर्यंत त्यांना मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो. काही लाज वाटत नाही. कमळाबाई म्हणत होतो आणि आता बेअकली म्हणतो.

तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला

यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला. कोंबडीचोर बरोबर घेतलाय तरी अंडी काही बाहेर येत नाहीयेत, त्यावर बोला. तुमच्या पेक्षा कोंबडं बरं. राम मंदिर बांधलं हे चांगलंच केलं. पण तुमची हिंमत नव्हती, तेव्हा शिवसेना पुढे होती. हिंदूहृदय सम्राट म्हणा नाहीतर तुमची जिभ सरळ करता येते. मी राम मंदिरात जाऊन आलो. तुम्ही भवानी मातेच्या मंदिरात का गेला नाहीत? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. ह्याच बालेकिल्ल्यात गद्दारी झाली असली, तरी निष्ठावंत शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबत आहे, ह्याची प्रचिती देणारी ही प्रचंड जाहीर प्रचार सभा झाली. सभेला शिवसेना नेते, आमदार अनिल परब, आमदार वैभव नाईक, तेजस ठाकरे तसेच इंडिया-महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!