नवी दिल्ली | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि बंगालचा दौरा आटोपुन आज बिहारमध्ये पोहोचलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १:५० च्या सुमारास गया विमानतळावर पोहोचले, तिथे बिहारचे मुख्यमत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ०१:५५ च्या सुमारास गया येथून हेलिकॉप्टरने औरंगाबादला रवाना झाले. पीएम मोदी ०२:२५ वाजता औरंगाबादला पोहोचले. यावेळी नितीश कुमार यांनी शाल पांघरून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पीएम मोदींना सांगितले की, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आता आम्ही पुन्हा इकडे तिकडे जाणार नाही. हे ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी हसायला लागले. याशिवाय आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नको आणि सर्व कामे एकत्रच करू, असेही ते म्हणाले. औरंगाबादेतील कार्यक्रम संपल्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास दोन्ही नेते हेलिकॉप्टरने बेगुसरायला रवाना झाले. दरम्यान मोदी बिहारला १लाख ७२ हजार कोटी रुपयांची भेट देणार आहेत.
दीड वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार एकत्र स्टेज शेअर केले. यापूर्वी बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचे युतीचे सरकार होते, ज्यातून नंतर नितीश कुमार यांनी वेगळे होऊन लालूंच्या राजद पक्षासोबत सरकार स्थापन केले. मात्र, नंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत बिहारमध्ये सरकार स्थापन केले आणि राजदपासून दुरावले. बिहारचे नितीश कुमार यांनी ९व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीतही गेले होते.
