जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मागील काळात शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाची साथ सोडून अनेक आमदार तसेच कार्यकर्ते यांनी भाजपा तसेच इतर पक्षात प्रवेश केला. मात्र अशा या पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पाचोरा येथील वैशाली सुर्यवंशी यांनी मात्र आज मंगळवार दि.१९ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. सूर्यवंशी यांच्यासोबत पाचोरा शहर तथा तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे.
वैशाली सूर्यवंशी ह्या पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिवंगत आर.ओ. पाटील यांच्या कन्या असून, शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण आहेत. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना स्वतःच्या बहिणीशी लढा द्यावा लागला. यंदाच्या निवडणुकीत स्वतः वैशाली सूर्यवंशी मैदानात होत्या, त्यामुळे शिव सैनिक दोन गटात विभागले गेले होते.
दरम्यान या निवडणूकीत वैशाली सूर्यवंशी यांचा पराभव झाला, आणि जळगाव जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाले. तेव्हापासून ठाकरे गटाच्या कार्यक्रमांत दिसत नव्हत्या. आणि आज अचानक वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

वैशाली सूर्यवंशी यांच्यासोबत माजी जि. प. सदस्य वर्षा वाघ, योजना पाटील, रंजना पाटील, लक्ष्मी पाटील, सविता शेळके तसेच अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री नितेश राणे, आमदार अनुप अग्रवाल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, हिरामण आप्पा गवळी, गजानन अंपळकर, नाना करपे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पक्ष प्रवेशापूर्वी वैशाली सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. अखेर मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. वैशाली सुर्यवंशी यांच्या पक्ष प्रवेशामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
