Home » महाराष्ट्र » धावत्या लोकलमधुन महिला रुळावर पडली ; जीव वाचला पण दोन्ही पाय गमावले !

धावत्या लोकलमधुन महिला रुळावर पडली ; जीव वाचला पण दोन्ही पाय गमावले !

नवी मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईसह उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला आहे. ठिकठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मिळेल ती लोकल पकडून प्रवासी जीवघेणा प्रवास करीत आहेत. अशातच नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सीबीडी बेलापूर स्टेशनजवळ एक महिला धावत्या ट्रेनमधून अचानक खाली पडली. त्यामुळे महिलेच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डबा गेला. या दुर्दैवी घटनेत सदर महिलेचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटल्याचे सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

https://twitter.com/mataonline/status/1810226422578876581?s=19

दरम्यान या घटनेनंतर रेल्वेस्थानकात प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. प्रवाशांनी या घटनेची माहिती तातडीने रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. ज्या लोकलखाली ही महिला आली ती लोकल उलट दिशेने मागे घेऊन या महिलेस बाहेर काढण्यात आले. सध्या ही महिला गंभीर जखमी असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबईत पावसाचा जोर ओसरला असून लोकलसेवा पूर्वपदावर येत आहेत.

प्रवाशांनी ट्रेनने प्रवास करताना घाईगरबड करू नये. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा तसेच उतरण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!