मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. या घटनेत ६६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अद्याप मदतकार्य सुरु असून घटनास्थळी अजूनही २५ ते ३० जण अडकल्याची माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील स्थितिची पहाणी केली. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. यावेळी मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यातील बेकायदेशीर असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच झालेल्या दुर्घटनेस जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने आज मुंबईत दाणादाण उडाली. मुंबईत आज दोन मोठे अपघात घडले. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. होर्डिंगखाली जवळपास ८० वाहने अडकल्याची माहिती समोर आली आहे. या होर्डिंगखाली १०० पेक्षा अधिक लोकं अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून आत्तापर्यंत ४८ जणांना बाहेर काढलंय.


या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अद्यापही दुर्घटनास्थळी मदतकार्य सुरुच आहे. दुर्घटनास्थळी पेट्रोल पंप, सीएनजी ज्वलनशील पदार्थांमुळे गॅस कटर वापरण्यात अडचणी येत आहेत. होर्डिंगचा प्रचंड आकार आणि त्याखाली अडकलेल्या वाहनांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. होर्डिंग तसेच गाडीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पेट्रोल पंप आणि सीएनजी पंपामुळे इथला ज्वलनशीलतेचा धोकाही वाढलाय. त्यामुळे पोलिस व प्रशासनाकडून नागरिकांना या भागातून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.
