कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची उपस्थिती…
अकोला | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्या अकोला येथील ‘स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन’च्या वतीने आयोजित १० दिवसीय महिला मुलींसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर अकोला येथे भारत विद्यालय क्रीडांगणावर पार पडले.
या दहा दिवसीय शिबिराचा जवळपास एक हजार महिला, मुलींनी लाभ घेतला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह उपस्थित होते. अशोक पंड्या, सुरेश खंडेलवाल, रामेश्वर फुंडकर, अरुण सारवान, खुशबू चोपडे, तसेच संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फाटे आदींच्या उपस्थितीत या सोहळ्याचा प्रारंभ भारत माता, राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाला. या शिबिरात सहभागी झालेल्या मुली व महिलांनी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांना मानवंदना दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फाटे यांनी प्रास्ताविक करीत फाउंडेशन महिला, मुलींना शारीरिक, मानसिक व आर्थिक सक्षम बनविण्यासाठी कसे प्रयत्न करेल याची माहिती दिली. सशक्त समाज घडवायचा असेल तर समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवावे लागतील, आणि ते जर रुजवायचे असतील तर सर्वप्रथम समाजामध्ये मा जिजाऊ घडवाव्या लागतील.

म्हणून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिजाऊ घडविण्याच्या दृष्टीने महिलांसाठी दहा दिवसीय लाठीकाठी प्रशिक्षण संस्थेने आयोजित केले. पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आताची कुटुंब व्यवस्था बदलत चाललेली आहे. आजची तरुण पिढी व्यसनामुळे आणि बॉलीवूडमुळे बर्बाद होत आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मुलींनी विचित्र कपडे घालू नये, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाले. सर्व प्रशिक्षकांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी
छेड होत असेल … तर तक्रार नोंदवा
मुली व महिलांना सायबर क्राईमबद्दल माहिती देत सायबर क्राईमच्या माध्यमातून आपली छेड होत असेल तर पोलिसांकडे त्याची तक्रार करण्याचे आवाहन एसपींनी केले. महिलांच्या सुरक्षा संदर्भात मदत लागल्यास अकोला पोलिस दल व दामिनी पथक हे सदैव संस्थेच्या सोबत राहतील असे आश्वासन दिले.
संचालन प्रांजली परसवानी यांनी तर अविनाश आगाशे यांनी आभार मानले. अशोक पंड्या यांनी यावेळी १४७० यथार्थ भगवत गीता भेट दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपिका फाटे, ममता लव्हाळे, योगिता चोपडे, माधुरी साबळे, स्वाती मांडेकर, तनिषा अंभोरे, राधा पांडे, हिरासिंह ठाकूर, गणेश चोपडे, हेमंत उके, संदीप पराते, भूषण सुळे, अक्षय शर्मा, रोहित रोहेल, सतपाल एललकार यांनी पुढाकार घेतला.
