Home » महाराष्ट्र » सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विधिमंडळ गटाने आज दुपारी २ वाजता बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड केली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील लोक भवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, यावेळी हॉलमध्ये “अजित दादा अमर रहें” च्या घोषणा घुमल्या.

सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार असून, त्यांचे पती आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दि. २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाले होते. अजित पवारांच्या निधनानंतर सदर उपमुख्यमंत्री पद रिक्त झाले होते, त्यामुळे एनसीपीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना ही जबाबदारी सोपवली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. शपथविधी सोहळा १२ मिनिटांत संपला, आणि त्यात अजित पवारांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या राज्यसभेच्या जागेवर त्यांचा मुलगा पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांची या शपथविधी सोहळ्यास अनुपस्थित होती. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण आले असून, एनसीपीच्या अजित पवार गटाची एकजूट दिसून येत आहे. पुढील काळात सुनेत्रा पवार कशा प्रकारे जबाबदारी पार पाडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!