“शाळेचा पहिला दिवस चला जाऊ शाळेला”
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज दि १६ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षास सुरवात झाली. शासन आदेशानुसार आज शाळे च्या पहिल्या दिवशी मानव सेवा विद्यालय जळगाव येथे विद्यार्थी स्वागत सोहळा वाजत गाजत आणि मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया, सहसचिव राजकुमार सेठिया, सदस्य देवेंद्र अग्रवाल, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया आंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, नम्रता सेठिया, पालक सदस्य -अर्चना पाटील, सोनाली चौधरी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभ प्रसंगी फुगे, फुले, पताका, रांगोळी, फुलांच्या माळा याद्वारे शाळा सुशोभीत करण्यात आली. विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शाळेत स्वागत करण्यात आले. तसेच औक्षण करून गुलाब पुष्प देऊन, खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेचा इयत्ता दहावीचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा निकाल ९६.७७ टक्के लागला असून याप्रसंगी इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी निलम जाधव, खुशाल वाघ, प्रेरणा माकोणे, राधिका बाविस्कर व पालकांचा ट्रॉफी, बक्षीस रक्कम, नॅपकिन, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.


तसेच विशेष सत्कार म्हणून आरव सेठिया, नेत्रा चौधरी, हिमानी पवार, आर्या डाकलिया, आदित्य घोलाणे, नेहा सेठिया या विद्यार्थ्यांचा व पालकांचा ट्रॉफी, नॅपकिन, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतून प्रथम आलेली निलम जाधव व Master in Architecture ही पदवी मिळवलेली नेहा सेठिया या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांचे ऋण व्यक्त केले.

त्यानंतर सर्व शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून शाळेचे प्रास्ताविक सादर केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. डाकलिया यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर गोष्टी सांगून मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश जाधव तर आभार योगिता घोलाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
