Home » महाराष्ट्र » २० ऑगस्ट रोजी कामगार आयुक्त कार्यालयावर कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मोर्चा

२० ऑगस्ट रोजी कामगार आयुक्त कार्यालयावर कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मोर्चा

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची बैठक नुकतीच मुंबई येथे घेण्यात आली. या बैठकीत कामगारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने येत्या २० ऑगस्ट रोजी दुपारी १:०० वाजता वांद्रे रेल्वे स्टेशन (पूर्व) येथून हजारो कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी मोर्चा बीकेसी येथील कामगार आयुक्तांच्या कार्यालयावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाने कंत्राटी पद्धत बंद करावी, सर्व कंत्राटी कामगारांना २६,००० रुपये किमान वेतन मिळावे, कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करावे, तसेच सर्वच आस्थापनातील‌ रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात, या मागण्यांसाठी हा राज्यव्यापी मोर्चा असणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्राचे प्रमुख समन्वयक, सिटूचे‌ नेते डॉ. डी.एल. कराड होते.

कंत्राटी कामगारांचे २० ऑगस्ट रोजीचे आंदोलन हे लक्षवेधक ठरावे यासाठी तत्पूर्वी ३ ऑगस्ट रोजी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यस्तरीय परिषद घेण्यात येणार आहे. या आंदोलनात सुमारे १०,००० वर कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांना उतरविण्याचा या प्रसंगी निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्रच्यावतीने परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीत प्रारंभी महाराष्ट्र इंटक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कृती समन्वय समितीच्या वतीने डॉ. डि.एल.कराड यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.

सिटूचे नेते डॉ.डि.एल. कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला, महाराष्ट्र इंटकच्यावतीने सरचिटणीस गोविंदराव मोहिते, मुंबई विभागीय अध्यक्ष दिवाकर दळवी तसेच कॉ. एम.ए. पाटील (एआयसीसीटीयू) विकास गुप्ते (एच.एम.एस), सुकुमार दामले (आयटक), कॉ. विवेक मॉन्टेरो (सीआयटीयू), मिलिंद रानडे (एनटीयूटी) कॉ. शुभा शमीम (सीटू), उदयभट, विजय कुलकर्णी (एआयसीसीटीयू), संजय सिंघवी (टीयूसीआय), तापती मुखोपाध्याय (बीयूसीटीयू) शिशिर ढवळे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत कृती समितीच्यावतीने कामगारांच्या प्रश्नावर छेडण्यात आलेल्या अनेक आंदोलनचा उहापोह करण्यात आला, युती सरकारने कामगारांच्या प्रश्नावर दिलेला नकारात्मक प्रतिसाद आणि त्यातून कामगारांचा वाढता असंतोष, वाढती महागाई आणि बेरोजगारी, नरेंद्र मोदी सरकारने स्वीकारलेल्या कामगार विरोधी धोरणावर वेळोवेळी उचललेल्या लढ्याचा‌ बैठकीत परामर्श घेण्यात आला.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील शहरी भागातील मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नसल्याची वस्तूस्थिती लक्षात आली आहे. ते एक आव्हान समजून येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त कामगारांपर्यत पोहोचून महायूती विरोधी प्रचारात उतरण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत कृती समितीचे लोकशा ही व संविधान बचाव विषयक आंदोलन प्रभावी ठरले, याबाबत बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!