मुंबई | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात मुंबई विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर होत्या. या कारणास्तव न्यायालयाने वॉरंट जारी केले.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या अनुपस्थितीबाबत त्यांची बाजू मांडणारे वकील प्रशांत मग्गु यांनी सुटकेसाठी अर्ज दाखल केला. मात्र वकिलाने दाखल केलेले प्रकृती अस्वास्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयाने फेटाळले. न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरुद्ध १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले. या वॉरंटची माहिती एनआयएला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट खटला सध्या अंतिम टप्प्यात आहे, जिथे कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अंतर्गत आरोपींकडून दिली जात आहेत. ३१३ प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे .
