पारोळा ( वास्तव पोस्ट ) : केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात होणाऱ्या अन्यायकारक व संतापजनक घटना पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची व न्याय प्रणालीची आजच्या घडीला अत्यावश्यक गरज आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव यांनी तामसवाडी. ता. पारोळा येथे केले.
नागरिक शिक्षण मंडळाचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तामसवाडी ता. पारोळा येथे कै.आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात अहिरराव बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची पुस्तके वाचून आपल्या ज्ञानात व कौशल्यात भर घालून सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावा.

याप्रसंगी डॉ. सतीश पाटील यांनी कै.भास्करराव पाटील यांच्या कारकीर्दीतील अनेक प्रसंग सांगत तालुक्यातील विकास कामांचे उद्गाते व तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून कै. भास्करराव पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरामण राजाराम पाटील होते. याप्रसंगी रा.काॅं. तालुकाध्यक्ष संतोष महाजन, ग्रामपंचायत पदाधिकारी, वि.का.सोसायटीच्या पदाधिकार्यांसह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.डी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
