भाग :१
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातील महाबळकडे जाणाऱ्या रस्त्याने दुतर्फा अलिशान शासकीय अधिकारी निवासस्थाने आहेत, तर काही ठिकाणी हायटेक पद्धतीचे कार्यालय आहेत. तसेच मागच्या बाजूला लघु पाटबंधारे विभाग व उपसा सिंचन बांधकाम विभाग असे कार्यालय असून या कार्यालयात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र येथील सुरक्षा रक्षकच नेमून दिलेल्या ठिकाणी दिसून येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की महाबळ परिसरातील हायटेक पद्धतीने शासकीय कार्यालय कार्यरत असून या कार्यालयात महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक रोजगार नियमन आणि कल्याण अंतर्गत शासकीय कार्यालय व प्रशासकीय साधन संपत्तीचे रक्षण व्हावे यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कार्यालय बंद होताच कार्यालयातून नियुक्ती केलेले सुरक्षारक्षकच घराकडे मार्गस्थ होतात. यामुळे कार्यालय सुटल्यावर कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते.

■ सुरक्षा रक्षकाची बायोमेट्रिक हजेरी नसल्याने बेशिस्ती वाढली
हायटेक पद्धतीचे लघुपाटबंधारे विभाग व उपसा सिंचन बांधकाम विभाग कार्यालय असून सुद्धा सुरक्षा रक्षकांची बायोमेट्रिक हजेरी पत्रक दिसून आले नाही. सुरक्षा रक्षकाच्या जवळ व्हिजिट नोंदवही, तक्रार पेटी, हजेरी पुस्तक, अभिप्राय नोंदवही पैकी काहीही दिसून आले नाही. अशा भोंगळ कारभाराने सुरक्षारक्षकांनी मनाला पटेल असे बे शिस्तीचे धडे लावून घेतले आहेत.
■ कार्यकारी अभियंत्यांची मात्र कुंभकर्णाची गाढ झोप !
लघुपाटबंधारे बंधारे विभाग उपसा सिंचन बांधकाम विभाग या कार्यालयात सुरक्षा रक्षकाच्या बाबत तक्रारींचा पाऊस पडतो असे काही अधिकाऱ्यांनी आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. असे असतांना देखील कार्यकारी अभियंता मात्र याबाबत अनभिज्ञ आहेत, असेच समजावे लागेल. ते सुरक्षा रक्षकांना शिस्तीचे धडे देतील की नरमाईची भूमिका घेऊन शासकीय साधन संपत्तीची सुरक्षा वाऱ्यावर सोडणार ? याचे उत्तर काळच सांगेल.
दरम्यान संबंधित विभागाकडून शासकीय साधन संपत्तीच्या सुरक्षिततेत सुरक्षा रक्षकांना काटेकोरपणा तसेच नियमांचे पालन करण्याचे आदेश देतील हीच जळगाव जिल्हा वासियांना अपेक्षा.
