जळगाव | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून उमेदार म्हणून शिवसेना उबाठा गटाचे करण पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्कंठा लागून असलेल्या सुवर्ण नगरी जळगाव लोकसभा मतदार संघात कोणाला उमेदवारी मिळणार यावर बरेच दिवस अनेक उमेदवारांची चाचपणी झाली व अखेर करण पवार यांनी बाजी मारली. आता करण पवार विरुद्ध स्मिता वाघ अशी जोरदार लढत होणार आहे.
दरम्यान आज भाजपला जळगाव लोकसभा मतदार संघात मोठे खिंडार पडले. भाजपाचे लोकसभा २०१९ चे खासदार उन्मेष पाटील यांना लोकसभा २०२४ साठी तिकीट न मिळाल्याने त्यांनी नाराज होऊन भाजपला जय महाराष्ट्र करून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन बांधुन घेतले. जिथे आत्मसन्मान राखला जात नाही, तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाही असे यावेळी उन्मेष पाटील म्हणाले. उन्मेष पाटील यांनीच करण पवार यांचे नाव सूचवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कोण आहेत करण पवार ?
करण पवार हे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे नातू आहेत. तसेच ते राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. पारोळा नगरपालिकेच्या निवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले होते. जळगाव भाजपचे विद्यमान खसदार उन्मेष पाटील यांचेही ते निकटवर्तीय आहेत. करण पवार यांच्याकडे पारोळा एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुखाची देखील जबाबदारी होती. करण पाटील हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष असुन त्यांच्या या राजकीय भूमिकेमुळे पारोळ्याच्या विधानसभा मतदार संघात देखील मोठे पडसाद उमटनार असुन भाजपला विधानसभेतही धक्का बसला तर आश्चर्य वाटायला नको.
करण पवार यांचा पारोळा, एरंडोल, भडगाव तालुक्याशी मोठी जवळीक असुन जनतेशी चांगला संपर्क आहे. करण पवार यांनी भाजपाला सोडून शिवबंधन बांधले असुन आता त्यांच्या सोबत किती राजकीय फ़ौजफाटा येतो हे येत्या काही दिवसांत दिसणार आहे.
