जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात बौद्धिक संपदा सायबर सुरक्षा आणि न्यायव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन जळगावचे मुख्य न्याय दंडाधिकारी एम.एस. बडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या इंक्युबॅशन इनोवेशन अँड लिंकेजसचे संचालक प्रो. डॉ. जावळेकर राजेश बाबुराव यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
यावेळी मंचावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा विभागाचे समन्वयक प्रो. डॉ. विकास गीते, ॲड. सुनील डी. चौधरी, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी हे होते. या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले यांनी भूषविले.
यावेळी मार्गदर्शन करतांना न्यायाधीश बडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हीच एक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करत आहे. ते मानवासाठी घातक ठरू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन केलेले शोध बौद्धिक संपदा मध्ये नोंदता येतील का? त्यासंदर्भात कायदेशीर तरतुदीचा अभाव असल्याचे अधोरेखित केले. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन तयार केलेल्या ॲपमुळे आपली सुरक्षा धोक्यात आली आहे. तसेच तपासात पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेची मदतच होणार असल्याचेही स्पष्ट केले.
यावेळी डॉ. जावळेकर, ॲड. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. ॲड. जंगले यांनी अध्यक्षीय समारोप पर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवराच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती जी.ए. सानप, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए.पी. भंगाळे, केसीई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी शुभेच्छा संदेश दिला.
कार्यक्रमास चर्चासत्र समन्वयक डॉ. डी.आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, डॉ. विजेता सिंग, प्रा. शरद चव्हाण, प्रा. अमिता वराडे, प्रा. बी.एस. पाटील, प्रा. नितीन मटकरी, डॉ. ज्योती भोळे, प्रा. स्वाती लोखंडे आणि राज्यभरातून आलेले संशोधक उपस्थित होते.
चर्चासत्राचे बीज भाषण डॉ. विकास गीते यांनी केले, तर
चर्चासत्राच्या तांत्रिक सत्रास कल्याण येथील बी.के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. कांतीलाल नगरे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव चे प्राचार्य डॉ. सुहास एस. गाजरे यांनी या विषयावर तज्ञ मार्गदर्शक केले. या तांत्रिक सत्रातील अध्यक्षस्थान केसीई व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय जळगाव चे प्रा.अनिलकुमार पांडुरंग मारथी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी शाखेचे सहअधिष्ठाता आणि धुळे येथील आंबेडकर लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय बहीराम यांनी भूषविले. तांत्रिक सत्र तीन मध्ये संशोधकानी आपले संशोधन लेख सादर केले.
चर्चासत्राच्या समारोप समारंभास मूळजी जेठा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. बी. एन. केसुर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधि विभागाचे सहअधिष्ठाता डॉ. विजय बहिराम यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी चर्चा सत्रातील चर्चेचा आढावा घेतला. समन्वयक डॉ. डी.आर. क्षीरसागर यांनी मान्यवरांचे आभार मानले.
