Home » जळगाव » अटल अमृत योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठा योजनेचा नवा अध्याय

अटल अमृत योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठा योजनेचा नवा अध्याय

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर येथे,  छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनी व २६ द.ल.ली. क्षमता असणार्‍या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन संपन्न झाले.

छत्रपती संभाजीनगर शहरात २०५० पर्यंत सुरळीत पाणीपुरवठ्याचा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून, यासाठी रु. १८०० कोटींच्या योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा काही खर्च छत्रपती संभाजीनगर महापालिकेला करावा लागणार होता; परंतु लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंतीनुसार दुसरी ऑर्डर काढून महानगरपालिकेचा खर्च महाराष्ट्र शासनाने उचलला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अटल अमृत योजनेचा भाग म्हणून ही योजना राबविली जात आहे. योजनेत सुधारणा करून ती पुनुरुज्जीवित करण्यात आली असून, योजनेची एकूण किंमत रु. २७०० कोटींपर्यंत वाढवली आहे. काम अत्यंत वेगाने सुरू असून, योजनेचे ८२ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ही योजना पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराला पुढील २५-३० वर्षे ३६५ दिवस आणि 24×7 पाणीपुरवठा उपलब्ध होईल. महानगरपालिकेचा रु. ८०० कोटींचा हिस्सा ‘HUDCO’ च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला असून, योजनेचे काम वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!