जळगाव ( वास्तव पोस्ट ) : निष्काम कर्मयोगी मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्सव समाजातील विविध संघटना द्वारे जल्लोषात साजरा करण्यात आला. संत गाडगेबाबा उद्यान येथे संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुणभाऊ शिरसाळे यांनी केले. त्यानंतर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या निनादात ढोल ताशे व पारंपरिक वाद्यासह शोभायात्रेस सुरवात झाली.

शहरातील विविध भागातून आलेल्या मिरवणुकीचे एकत्रीकरण करून मुख्य शोभायात्रा सुरू झाली. यात जळगाव जिल्हा परीट धोबी सेवा मंडळ, जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेतर मंडळ, जुने जळगाव परिसर मित्र मंडळ, जळगाव शहर परदेशी धोबी समाज, गाडगेबाबा नगर (कासमवाडी) धोबी समाज मंडळ, संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन, कोंबडी बाजार परिसर धोबी समाज मंडळ, जळगाव जिल्हा सर्व भाषिक धोबी महासंघ यांचा समावेश होता.
शोभायात्रेत संत गाडगेबाबा यांची भव्य मूर्ती सजविलेल्या वाहनावर ठेवण्यात आली होती. तसेच संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरील तसेच त्यांनी दिलेल्या दशसुत्री संदेशाचे, स्त्री भ्रूण हत्या थांबवा, पाणी जिरवा पाणी वाचवा या संदेशाचे विविध सुशोभित चित्ररथाचा समावेश होता. शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा तसेच फेटे बांधून महिला भगिंनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरणारे युवकांचे झांज पथक, लाठी काठी व दांडपट्टा याचे चित्तथरारक प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होते.

मिरवणूक मार्गात चौका चौकात विविध समाज व संस्था यांचे वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, शिक्षण विस्तार अधिकारी तथा शा.पो.आ. अधिक्षक व ग. स. सोसायटीचे संचालक विजय पवार, जिल्हा शिवसेना प्रमुख माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे हे सुध्दा मिरवणुकीत सहभागी झाले होते.

अतिशय शिस्तबध्द पद्धतीने संत गाडगेबाबा उद्यान येथून सुरू झालेली शोभायात्रेचा स्टेडियम चौक- छ्त्रपती शिवाजी महाराज चौक- नेहरू चौक- टॉवर चौक- चित्रा चौक- जुने कोर्ट चौक मार्गे संत गाडगेबाबा उद्यान येथे समारोप झाला. उद्यानात झालेल्या कार्यक्रमात मिरवणुकीत सहभागी मंडळांचा शाल व सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जयकिशन अशोक सपकाळे व अनिकेत सतीश जाधव दोघ तरुणांचा एमपीएससी महसूल विभागाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा धोबी सेवा मंडळाचे सहसचिव अरुण सपकाळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश बच्छाव यांनी केले. त्यानंतर दुपारी महाप्रसाद भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जयंती उत्सव यशस्वी आयोजनासाठी सहभागी सर्व समाज संस्था यांचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
