Home » जळगाव » अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मेहरूण तलावाजवळील जैन ड्रीम स्पेस क्रिडांगणाची पाहणी करताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन सोबत जैन स्पोर्स्टस अकॅडमीचे सहकारी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. ६ रोजी संध्याकाळी ५ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होईल. ही स्पर्धा दि. ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान होईल. सोमवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यांच्यासोबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे व पदाधिकारी, जैन स्पोर्टस अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल व पदाधिकारी असतील.

सीआयएससीई बोर्डच्या अंडर-१७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, नॉर्थ इंडिया, वेस्ट इंडिया, पोर्टब्लेअर अंदमान निकोबार बेटसह दुबई या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासह १२ राज्यांचे क्रिकेट संघ  सहभागी होत असून २६० खेळाडूंनी सहभाग  घेतला आहे. साखळी व बाद पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचे अनुभूती निवासी स्कूल मुख्य आयोजक आहेत. जैन इरिगेशन व जैन स्पोर्टस अकॅडमी मधील सहकारी त्यासाठी सहकार्य करत आहेत. साखळी सामने प्रत्येकी १५ षटकांचे असतील. तर उपांत्य व अंतिम सामने हे २० षटकांचे होतील. साखळी पद्धतीमध्ये १५ सामने होतील. अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल, जैन ड्रीम स्पेस-मेहरूण तलावाजवळ तसेच एमके स्पोर्टस-सावखेडा च्या दोघंही मैदानांवर सामने रंगणार आहेत.

अ ब क ड अशा चार गटामध्ये रंगतील सामने

सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ही ए, बी, सी, डी अशा चार गटात  होईल. यात ‘अ’ गटात  पोर्टब्लेअर अंदमान निकोबार, महाराष्ट्र, ओव्हरसीस, उत्तराखंड, ‘ब’ गटात ओडीसा, नॉर्थ वेस्ट, पश्चिम बंगाल, ‘क’ गटात बिहार अॅण्ड झारखंड, तामिळनाडू पी. ए. निको, मध्यप्रदेश, ‘ड’ गटात कर्नाटक अॅण्ड गोवा, नॉर्थ इंडिया, केरळ संघ असतील. यात ‘अ’गटात चार तर ब, क, ड गटांमध्ये प्रत्येक तीन संघ खेळतील. प्रत्येक गटातून प्रथम क्रमांकाचा संघ उपांत्य फेरीत लढत देईल. उपांत्य फेरीत ‘अ’ विरूद्ध ‘ड’ तसेच ‘ब’ विरूद्ध ‘सी’ असे सामने होतील. यातील  विजेते अंतिम फेरीसाठी खेळतील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!