मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने सध्या बैठकींचा सपाटा लावला असून त्यात सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. महायुतीतून शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे हे या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. तर महायुतीतून अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीतुन दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आल्यामुळे महायुतीत बिघाडी झाली आहे. अशा परिस्थितीत भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आता मंत्री गिरीश महाजन नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आपला अनुभव कसा पणाला लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान गिरीश महाजन यांची नियुक्ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या पाठीशी भाजपची ताकद लागणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार दिल्याने महायुतीत बिघाडी झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार, ठाकरे गटाचे संदिप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी मुकाबला आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि आता मंत्री गिरीश महाजन यांची एन्ट्री झाल्यामुळे शिक्षक मतदार संघाची निवडणूक अतिशय चुरशिची होणार यात मात्र शंका नाही.
