जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव’ आणि ‘प्रागतिक इतिहास संस्था, महाराष्ट्र’यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविद्यालयाच्या न्यू कॉन्फरन्स हॉल येथे ‘विशेष व्याख्यान’ आणि ‘संशोधन कार्यशाळा’ यशस्वीरीत्या संपन्न झाली. कार्यशाळचे उद्घाटन मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ.भूपेंद्र केसुर यांनी केले.
पहिल्या सत्रात आय.आय.टी. मंडी, हिमाचल प्रदेश येथील संशोधक विद्यार्थी राज शिरोडे यांचे विशेष व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या व्याख्यानात ‘ओडीशा राज्यातील महानदी खोऱ्यातील ऐतिहासिक भूगोलाच्या परिप्रेक्षातून बौद्ध पुरातत्व’ या विषयावर प्रकाश टाकला. व्याख्यानामध्ये पुरात्वीय साधनांचा वापर इतिहास लेखनात कसा केला जातो याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी केलेल्या संशोधनाचा संपूर्ण आढावा त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. ऐतिहासिक साधनांचा अन्वयार्थ लावताना कोणकोणत्या समस्या निर्माण होतात व त्यातून समस्या निवारण कसे करावे याबद्दलची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या सत्राचे अध्यक्ष इतिहास विभाग प्रमुख तथा मानव्यविद्या शाखेचे उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संशोधनाची व्याप्ती, संशोधनाचे महत्त्व, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, प्राचीन वारशांचे जतन आणि महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. सत्राचे प्रास्ताविक प्रा. डॉ.जुगलकिशोर दुबे यांनी केले तर प्रा. डॉ.डी.एस. सोनटक्के यांनी आभार मानले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ.प्रशांत देशमुख यांनी ‘उपयोजित इतिहास लेखन आणि संशोधन’ या विषयावर मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांचा एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन तार्किक व संशोधक वृत्तीचा असायला पाहिजे, संशोधन क्षेत्रातील आव्हाने कोणती आहेत? विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रातील संधी कशा उपलब्ध होतील? याविषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रा. डॉ.पंकजकुमार प्रेमसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, आजच्या काळात संशोधनाची दशा व दिशा कशी आहे? विद्यार्थ्यांनी यातून समाजपयोगी संशोधन कसे केले पाहिजे. याविषयी आपले मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेस मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.संजय भारंबे तसेच प्रागतिक इतिहास संस्थेचे प्रा. डॉ. जगदीश सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेस विशेष उपस्थिती म्हणून इतिहास विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. के.के. वळवी, पाल येथील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.सी.पी. लभाणे, डॉ. यू.डी.भिरुड, डॉ. जे.व्ही. दुबे, डॉ. एल.पी. वाघ, डॉ. नासिकेत सुर्यवंशी, डॉ. सागर बडगे, डॉ. राम बुधवंत, डॉ. मनोज महाजन यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. योगेश अत्तरकर यांनी जबाबदारी पार पाडली. कला शाखेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, संशोधक विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
