ठाणे | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले. ठाणे शहरातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या खेळाडूंनी राज्य आणि देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे, याचा अभिमान आहे असे सांगून राज्यातील खेळाडू गुणवान आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने त्यांच्या बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील पारितोषिकांच्या रकमेतदेखील भरघोस वाढ करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पहिल्या क्रमांकास पाच लाख, दुसऱ्या क्रमांकास तीन लाख आणि तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाची रक्कम दोन लाख रुपये करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
