जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (स्वायत्त) ‘अध्ययन व अध्यापन’ या विषयावर डॉ. मृणालिनी फडणवीस, माजी कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ, तसेच शैक्षणिक संचालिका, केसीई सोसायटी, जळगाव यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्राध्यापकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्यानुसार नॅक मुल्यांकनामध्ये झालेले बदल, आधुनिक अध्ययन व अध्यापन पद्धती याविषयी माहिती दिली. विद्यार्थांची वर्गातील उपस्थिती व त्या अनुषंगिक मुद्द्यावर प्राध्यापकांशी संवाद सांधला. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण आणि डिजिटल साधनांचा उपयोग याविषयी सखोल मार्गदर्शन केले, याचबरोबर त्यांनी प्राध्यापकांना प्रात्यक्षिक करून दाखवले जणेकरून प्राध्यापकांनी त्याचा उपयोग आपल्या अध्यापन पद्धती मध्ये करावा असे आव्हान त्यांनी केले, ज्यामुळे विद्यार्थांना शिकत असतांना युनिटी, टीमवर्क, वेळेचा सदुपयोग असे विविध गुण अंगीकारता येतील.
डॉ. फडणवीस यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये उद्यमशीलता विकास, मूल्यमापन प्रणाली, संशोधनाधारित अध्यापन, आणि शिक्षणात नैतिकता, दैनंदिन जीवनातील मुल्ये यांसारख्या विविध विषयांचा समावेश करुन प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित प्राध्यापकांनी प्रभावी अध्यापन कौशल्य, विद्यार्थांशी सकारात्मक संवादम आणि मूल्याधिष्ठित ज्ञान-संवादाच्या पद्धती आत्मसात केल्या, तसेच शैक्षणिक सर्जनशीलता वाढवण्याचा संकल्प केला.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे संचालक प्रा. बी.व्ही. पवार, करिअर कट्टा समन्यवक डॉ. शमा सराफ, प्रा. डॉ. ममता दहाड, एस.एन खान आदि उपस्थिती होते. सूत्रसंचालन डॉ. दिपाली पाटील, तर आभार यामिनी भाटीया यांनी केले.
