बंगळुरू ( वास्तव पोस्ट ) : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्यांकडून हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतरांविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलाय. शहरातील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
जनाधार संघर्ष परिषदेचे (जेएसपी) सह-अध्यक्ष आदर्श अय्यर यांनी बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि इतरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अय्यर यांनी इलेक्टोरल बाँडद्वारे ८ हजार कोटी रुपये गोळा करून बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप केला होता. सदर प्रकरणाचा तपास करणाऱ्या न्यायालयाने शुक्रवारी टिळक नगर पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले.
निर्मला सीतारमण यांच्यावर गुन्हेगारी कट आणि खंडणीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी आणि इतरांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदर्श आर.अय्यर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, “अंमलबजावणी संचालनालयाचा वापर करून, देशातील कॉर्पोरेट कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आणि निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ८ हजार कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. राजकीय फायद्यासाठी ईडीचा वापर करून कंपन्यांवर हल्ले झाले, सीईओ आणि एमडींना अटक करण्यात आली. अटकेच्या भीतीमुळे कंपनी मालकांना इलेक्टोरल बाँड्स खरेदी करण्यास भाग पाडण्यात आहे.”
“एप्रिल २०१९ ते ऑगस्ट २०२२ आणि नोव्हेंबर २०२३ पर्यंत कॉर्पोरेट ॲल्युमिनियम आणि कॉपर दिग्गज एमएस स्क्वेअर लाइट आणि वेदांत कंपन्यांकडून एकूण २३०.१५ कोटी रुपये मिळाले. सर्व आरोपींनी अरविंदा फार्मा कंपनीच्या ४९.५ कोटी रुपयांसह सुमारे ८ हजार कोटी रुपये बेकायदेशीरपणे निवडणूक बॉंडमध्ये रूपांतरित केले. याप्रकरणी आरोपींवर कारवाई करावी,” असे अय्यर यांनी तक्रारीत म्हटले आहे. आदर्श अय्यर हे जनाधिकार संघर्ष परिषद चे सह अध्यक्ष आहेत. जेएसपी ही संस्था शिक्षण हक्क कायदा आणि इतर मुद्द्यांशी संबंधित समस्यांवर काम करते.
