मुंबई | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी कालच उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या शिवसेना शाखांना भेटी दिल्या, जोगेश्वरीमध्ये रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले होते. आणि ह्या भेटीनंतर २४ तासांमध्येच रवींद्र वायकर यांनी पक्ष सोडला आहे.
रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खुप मोठा धक्का मानला जात आहे. वायकर हे मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षही होते. ठाकरे आणि वायकर कुटुंबियांनी रायगड जिल्ह्यात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. जोगेश्वरीतील राखीव भूखंड अपहार प्रकरण आणि रायगडमधील बेहिशोबी मालमत्तेमुळे वायकर ईडीच्या रडारवर होते.
यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी ज्यांना सर्व काही दिलं त्यांनी माझ्यासोबत गद्दारी केली आणि ज्यांना काही दिलं नाही ते माझ्यासोबत आहेत. शिवसेनेची ताकद त्यांना कळलेली नाही. इकडचा एक खडा तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होत नाही.”
आमदार रवींद्र वायकर यांच्यावर पक्षांतर करण्यासाठी ED कारवाईचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता.
