छत्रपती संभाजीनगर | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मातृदिनी गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा असुन गर्भनिदान करणारे एक रॅकेटच उद्ध्वस्त केले आहे. या कार्रवाईत एक १९ वर्षीय इंजिनिअरींगला असणारी तरुणी आपल्या राहत्या घरात लिंग निदान करत असल्याची बाब समोर आली आहे. सदर मुलीच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त केले आहे.
छत्रपति संभाजीनगर मध्ये तिरुपती नगर परिसरात या तरुणीवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केली जात असल्याची गुप्त माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती. माहीतीच्या आधारे मनपाच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भनिदान करण्यात येत असल्याचे पथकाला आढळून आले.
आरोग्य विभागाच्या पथकाने अधिक चौकशी केली असता यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी १२ लाख ७८ हजारांची कॅश मिळून आली. तसेच या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, टॅब देखील मिळून आले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
