Home » महाराष्ट्र » भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

रत्नागिरी ( वास्तव पोस्ट ) : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील ‘दिवाणी व फौजदारी न्यायालया’च्या नूतन इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दिवाणी व फौजदारी न्यायालया’च्या नूतन इमारतीच्या परिसरात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी ८ ऑक्टोबर २०२३ रोजी मंडणगड येथील ‘दिवाणी व फौजदारी न्यायालय’ इमारतीचे भूमिपूजन केले होते. न्यायालयाच्या या नूतन इमारतीच्या माध्यमातून लोकांसाठी न्यायदानाची एक गतिशील व्यवस्था तयार झाली असून, याचे श्रेय भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात न्यायालयीन पायाभूत सुविधांचा विकास २०१४ पासून सुरु असून, आतापर्यंत आमच्या सरकारने न्यायालयाच्या जवळपास १५० इमारतींना मान्यता दिली असून त्यातील अनेक इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. तसेच चिपळूण येथे न्यायालय उभारण्याची मागणी देखील लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि न्याय दिला आहे. यावेळी संविधानाला अपेक्षित असलेला विचार व परिवर्तन साध्य करण्याची जबाबदारी शासन चांगल्या पद्धतीने पार पाडेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!