नाशिक | दि.३० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महावितरणच्या नाशिक मंडळ विभागात गेल्या १४ वर्षात ग्राहकांकडून मीटर टेस्टिंगच्या नावाखाली ३ कोटी रुपये शुल्क आकारण्यात आले. परंतु मीटर टेस्टिंग मात्र करण्यात आलेली नाही. मागील ३ वर्षात टेस्टिंगच्या नावाखाली २३ हजार ६१८ ग्राहकांचे ६७ लाख रुपयांची फसवणूक महावितरणने केली आहे. या संदर्भात मीटरची टेस्टिंग न केल्यामुळे सदरची फी ग्राहकांना परत करण्यात यावी, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ने एका निवेदनाद्वारे मुख्य अभियंत्याकडे केली आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची कारवाई करावी, अशी ही मागणी केली आहे.
महावितरणच्या मध्यवर्ती सुविधा केंद्र कार्यालयात दरवर्षी सरासरी १० हजार ग्राहकांकडून मीटर शुल्क तपासणीच्या नावाखाली सुमारे २८ लाख रुपये शुल्क जमा केले जाते. परंतु त्या वीज मीटरची तपासणी केली जात नाही. एखादे घर स्थावर मालमत्ता विकल्यास वीज मीटरचा मालकी हक्क बदल करण्यासाठी महावितरणच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रात अर्ज केल्यास महावितरण कंपनीचे सर्विस शुल्क व मीटर तपासणी शुल्क असे ३६० रुपये फी जमा करावी लागते. त्यानुसार मीटर तपासणी करणे हे महावितरणचे काम आहे. असे असूनही गेल्या १४ वर्षात मीटर तपासणी अहवाल न केल्यामुळे या संदर्भातला कुठलाही अहवाल महावितरणकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.
वर्ष २०२१-२०२२ व २०२३ या ३ वर्षासाठी २३ हजार ६१८ ग्राहकाकडून ६६ लाख ८०हजार ९५० रुपये मीटर तपासणी शुल्क जमा केल्याचे दिसून येते. यातील ९९% टक्के वीज मीटरची तपासणी झालेली नाही. आणि म्हणून ज्यांचे वीज मीटरची तपासणी केलेली नाही अशा ग्राहकांना ही फी परत करण्यात यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. याबाबतचे निवेदन मा. अधीक्षक अभियंता नाशिक मंडळ, आणि मा. मुख्य अभियंता, नाशिक परिमंडळ, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. नाशिक यांना देण्यात आले आहे.
महावितरणने तातडीने या संदर्भात कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाचे नेते डॉ. डी.एल.कराड, ॲड. तानाजी जायभावे, ॲड. वसुधा कराड, कॉ.सिताराम ठोंबरे , कॉ.दगडू व्हडगर, कॉ.दिनेश सातभाई यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
