जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन, पुणे द्वारा आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड तसेच नेहरू युवा केंद्र आणि स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.१२ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत नांदेडच्या कुसुम सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यात जळगावच्या केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र, तसेच मूळजी जेठा महाविद्यालय, आणि ओजस्विनी कला महाविद्यालयातील एकूण २६ विद्यार्थ्यांनी नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व केले.
कान्ह ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी राजस्थानी समूह लोकनृत्य तसेच पोतराज समूह लोकगीत संघाचे नेतृत्व केले, मुळजी जेठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कथालेखन, काव्य लेखन या कला प्रकारात आपले सादरीकरण केले. तर ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
या महोत्सवात राज्यभरातील आठ महसूल विभागातील २४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या कुणाला जाधव या विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले तसेच याच उजव्यास्विनी कला महाविद्यालयाच्या समय चौधरी या विद्यार्थ्याने पोस्टर मेकिंग या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. कान्ह ललित कला केंद्राद्वारे सादर झालेल्या समूह लोकगीत गायन स्पर्धेत सादर केलेल्या पोतराज गीतास राज्यस्तरावरचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. तर मुळजी जेठा महाविद्यालयाच्या रसिका ढेपे या विद्यार्थिनी काव्य लेखनाचे राज्यस्तराचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
तीन दिवस चाललेल्या या राज्य महोत्सवात सर्वाधिक पारितोषिक प्राप्त करणारे नाशिक विभाग हे अव्वल ठरले. या नाशिक विभागाच्या संघाचे संघप्रमुख म्हणून प्रा. प्रसाद देसाई यांनी काम पाहिले, विद्यार्थ्यांच्या या कला प्रकारासाठी नृत्य विभाग प्रमुख अजय शिंदे, संगीत विभागप्रमुख कपिल शिंगाणे, देवेंद्र गुरव, मराठी विभागाचे प्रा. गोपीचंद धनगर यांचे विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले. राज्य महोत्सवातील कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जळगाव जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व क्रीडा अधिकारी सुरेश तारकुडे, यांच्या विशेष उपस्थितीत तसेच केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा.एस एन भारंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
