अहमदनगर | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह ११ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. पक्षाचे नेते व पदाधिकारी घरोघरी भेटी देत आहेत. उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने मतदान होईल याकरीता नियोजन सुरु आहे.
दरम्यान, मतदानाला एक दिवस बाकी असतानाच नगर शहरातील जुना वाद उफाळून आल्याने दोन गटांत राडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. शहरातील माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडल्याने वाद झाला. जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या या वादात सागर मुर्तडकर यांचे कार्यालय फोडण्यात आले असून एका स्कार्पिओ वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेने मंगलगेट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
