Arvind Kejriwal Bail : ईडी च्या विरोधानंतरदेखील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आल्याने ईडीला न्यायालयाकडून एकाप्रकारे झटका मिळाला आहे. दिल्लीतील सेशन कोर्टने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.
दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. ईडी च्या विरोधानंतरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर दिला आहे. गेल्या महिन्यात त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पुन्हा २ जून रोजी तिहार तुरुंगात शरण जावे लागले होते.
आजच्या कोर्टाच्या निर्णयानंतर आता केजरीवाल तिहार जेलमधून उद्या दि. २१ जून शुक्रवार रोजी बाहेर येऊ शकतील. ईडीने केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक महिन्याचा अंतरिम जामीन दिला होता. त्यानंतर त्यांनी जामीन वाढवण्याची विनंती केली होती. पण तेव्हा कोर्टाने निवडणूक झाल्यानंतर पुन्हा शरण येण्यास सांगितले होते. निवडणुका झाल्यानंतर आता मात्र केजरीवाल यांना नियमीत जामीन मिळाला असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा आम आदमी पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान ईडीकडून ॲडिशनल सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी बाजू मांडली. ईडी कडून सांगितले की, ईडी हवेत तपास करत नाही तर तपास यंत्रणेकडे ठोस पुरावे आहेत.
कोर्टाच्या निर्णयानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. दिल्लीतील पक्ष कार्यालय तसेच मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. आपचे खासदार संजय सिंह यांनी, केजरीवाल जेलमधून बाहेर आल्याने लोकशाही मजबूत होईल अशी प्रतिक्रिया दिली.
