नंदुरबार | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नवापुर शहर नगरपालिका हद्दितील शाळा बंद असल्या बाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षणाधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. सतिष सुरेश चौधरी (वय ५२), जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नंदुरबार, वर्ग-१ असे लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना नवापूर शहर, नगरपालिका, मालमत्ता क्र. ८२६, सीटी सर्वे क्र. ६२४, पंचरत्न शॉपिंग, कॉप्लेक्स येथे हॉटेल सुरु करावयाची असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर जिल्हा परिषदेची एक शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने एफ एल ३ परवाना देण्यास हरकत घेतली होती.
परंतु आजरोजी सदर शाळा सुरु नसुन शाळेची इमारत ही जीर्ण होऊन शाळा बंद पडलेली असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागकडून सदर शाळा बंद असले बाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अशरफ भाई माजिदभाई लखानी अल्पसंख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे बदल्यात दोन्ही कामांचे मिळून चौधरी यांनी ५०,००० रुपयांची मागणी केली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषद कार्यालयातील आपल्या दालनात चौधरी हे ५०,००० रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, पो.ना. गणेश निंबाळकर यांनी केली.
