जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्हा परिषदेने निधी खर्चात राज्यात मोठी आघाडी घेतली असून जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर पोहोचला असल्याने शासन दरबारी देखील जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात दि.६ मार्च रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
महिला बाल विकास विभागाचे प्रकल्प संचालक देवेंद्र राऊत यांनी मनोगतात सांगितले की केंद्र शासनाच्या पोषण आहार योजनेअंतर्गत ४ हजार ९६ स्मार्टफोन जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झाले आहेत.

या स्मार्टफोनच्या माध्यमातून बालकांची उपस्थिती आहाराचे वाटप तसेच कुपोषणाच्या नोंदी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळण्याची मागणी शासन दरबारी प्रलंबित होती. मात्र खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविकांची ही मागणी या माध्यमातून पूर्ण झाली असल्याने आता अंगणवाडी सेविकांना देखील उत्कृष्टपणे काम करता येणार आहे. अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांच्या वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचाराधीन असून लवकरात लवकर याबाबतची घोषणा होणार असल्याचे देखील पालकमंत्र्यानी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारीअधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, महिला बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
