Home » महाराष्ट्र » अमोल मिटकरींचे धक्कादायक प्रश्न : विमान अपघातात ६ मृत्यू ! मग सहावी व्यक्ती कुठे ?

अमोल मिटकरींचे धक्कादायक प्रश्न : विमान अपघातात ६ मृत्यू ! मग सहावी व्यक्ती कुठे ?

बारामती ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात फक्त ५ मृतदेह सापडल्याचा मुद्दा उपस्थित करत मिटकरींनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टने राज्यात खळबळ उडवली असून, अपघात की घातपात असा चर्चेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे येत असताना लँडिंगच्या वेळी विमानाला आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे, पण प्रत्यक्षात केवळ ५ मृतदेहच सापडले आहेत. या विसंगतीवर मिटकरींनी बोट ठेवले आहे.

मिटकरी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, “आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी खुर्ची आदरणीय दादांची!! मृत्यूच्या एक दिवस आधी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय.”

अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न
• अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात ५ मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली?
• टेक-ऑफ आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
• एवढ्या भीषण आगीत एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही?
• पायलट इतक्या वेळा का बदलले गेले?
मिटकरींनी हे प्रश्न अपघातानंतर तीन दिवसांच्या शंकेतून उपस्थित केले असून, पोस्ट मध्ये पुढे ते म्हणतात की हे प्रश्न विचारणे म्हणजे अफवा पसरवणे नाही. तपास यंत्रणांनी धक्कादायक माहिती उघड केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मुद्दे मांडले आहेत.

या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, काहींनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातही भावनिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मिटकरी स्वतः अजित पवारांच्या निकटवर्तीयांपैकी एक असून, यापूर्वीही दादांच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसले आहे.

तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत असून, लवकरच अधिकृत अहवाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मिटकरींच्या प्रश्नांनी या घटनेला नवे वळण मिळाले असून, जनमानसात चर्चा सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!