जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे १९९९ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अशोक राणे शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव, शाळेचे माजी मुख्याध्यापक दिलीपकुमार चौधरी, माजी मुख्याध्यापिका वैजयंती तळेले, ज्येष्ठ शिक्षिका व्ही.एम.पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक पर्यवेक्षक नरेंद्र पालवे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणेश पुजनाने करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांना पेन आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात प्राचार्य अशोक राणे यांनी माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतांना म्हटले की, शाळेतून आपण जे संस्कार घेऊन समाजात सन्मानाने जगत आहोत हे विद्यालयाचे ऋणानुबंध कायम जोपासा.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रणिता झांबरे यांनी माजी विद्यार्थ्यांची देश विदेशात झालेली प्रगती व आठवणींना उजाळा दिला. डी.व्ही.चौधरी, वैजयंती तळेले यांनी मनोगत व्यक्त व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गमती जमती किस्से सांगून आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील बाकांवर जाऊन आपल्या वर्गमित्रांसोबत शालेय जीवनाचा पुन्हा आनंद लुटत भावनिक आठवणी जागृत केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी तर आभार प्रदर्शन नरेंद्र पालवे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
