Eknath Shinde : आषाढ़ी एकादशी निमित्त महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल होताच त्यांनी लाडक्या भावांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत १२ वी, डिप्लोमा व पदवीधरांना विद्यावेतन दिले जाणार आहे.
पंढरपुर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे. या योजनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आता विद्यार्थ्यांसाठी खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा धारकांना ८आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठ्लाच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री कुटूंबासह पंढरपुरात आले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी कृषी पंढरी २०२४ प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभातून विद्यार्थ्यांसाठी या योजनेची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना आणली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यभरातील माझ्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये दरमहा जमा होणार, तर काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं, पण लाडक्या भावाचं काय ? भावाचं काय तर, त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार,आता बारावी पास झालेल्यांना ६ हजार, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार आणि डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजार रुपये महिन्याला स्टायपेंड दिला जाणार आहे. त्यामध्ये, वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो प्रशिक्षित होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे, इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
