नवी दिल्ली | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. देशातील प्रशासकीय, पोलिस आणि परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसह अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या कठीण परिक्षेत लखनऊ येथील रहिवासी आदित्य श्रीवास्तव हा देशात प्रथम आला आहे.
आदित्य श्रीवास्तवने ऑक्टोबर २०१७ पासून नागरी परीक्षेची तयारी सुरू केली. २०२१ मध्ये आदित्यने UPSC मध्ये ४८५ रँक मिळवले होते. यावेळी आदित्य श्रीवास्तवला त्याच्या वरिष्ठांकडून खूप मदत मिळाली. तसेच स्वतःचा अनुभव देखील कामात आला. एका मुलाखतीदरम्यान आदित्य श्रीवास्तवने सांगितले की, प्रत्येकासाठी UPSC ची तयारी करणे आणि त्यात क्रॅक करणे सोपे नसते. आणि यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. मला सर्व क्षेत्रात काम करून लोकांची सेवा करायची आहे. आधीपासूनच लोकसेवा हेच माझे उद्दिष्ट होते असे आदित्यने सांगितले.
युपीएससीने https://upsc.gov.in/ या वेबसाईटवर निकाल जाहीर केला असून पहिल्या १०० जणांमध्ये महाराष्ट्रातील अनिकेत हिरडे ८१व्या स्थानावर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये १ हजार १४३ पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली होती. पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ९ एप्रिल २०२४ रोजी मुलाखत झाली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर झाले.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवरुन शुभेच्छा संदेश दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, " ज्यांना नागरी सेवा परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही त्यांना मी सांगू इच्छितो- अडथळे कठीण असू शकतात, परंतु लक्षात ठेवा, हा तुमचा प्रवास संपत नाही. परीक्षेत यशस्वी होण्याच्या संधी पुढे आहेत, पण त्याही पलीकडे भारत अशा संधींनी समृद्ध आहे जिथे तुमची प्रतिभा खऱ्या अर्थाने चमकू शकते. प्रयत्न करत रहा आणि पुढे असलेल्या अफाट शक्यतांचा शोध घेत रहा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ".
